पुणे : सनसिटी भागात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात रक्त तपासणी, हृदय आजार तपासणी, ईसीजी, मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया, दंत तपासणी व दंत उपचार, कॅन्सर आजार उपचार यांसह संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली. सुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सनसिटी परिसरातील २६३७ नागरिकांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले. सनसिटी, माणिकबाग, नवीन डीपी रोड, सिंहगड रस्ता परिसरात आयोजित या शिबिरात मोफत केमोथेरपी, रेडिएशन, विविध शस्त्रक्रिया, खुब्याची शस्त्रक्रिया, किडनी स्टोन उपचार, दुभंगलेले किंवा फाटलेले ओठ शस्त्रक्रिया, हाडांची ठिसूळता तपासणी, मधुमेह तपासणी, डायलेसिस, ऍक्युप्रेशर उपचार तसेच औषध वाटप करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मंजुषा नागपुरे यांनी केले असून दीपक नागपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर घेण्यात आले. यावेळी दीपक नागपुरे यांनी सांगितले की, डी वाय पाटील आयुर्वेदिक, बॉडी वेलनेस सेंटर, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल, विघ्नहर्ता डायग्नोस्टिक, जहांगीर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, सिल्वर बर्स हॉस्पिटल, लायन्स क्लब हॉस्पिटल, देवयानी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, पार्वती नर्सिंग होम, देशपांडे आय हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, निरामय आयुर्वेद व निसर्गोपचार चिकित्सालय, डी वाय पाटील डेंटल हॉस्पिटल यांच्यासह फुल बॉडी चेकअप, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, अन्नधान्य वितरण विभाग आदी विविध विभागांचा या शिबिरात समावेश होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. यावेळी आयोजिका मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, या शिबिराच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मोफत तपासण्या, उपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. आरोग्याचा महायज्ञ राबविताना निरोगी सिंहगड रस्ता हा संकल्पही घेण्यात आला.