पुणे – गेले काही दिवस इंडिगो विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. यात भर म्हणून इतर विमान कंपन्यांनी इंडिगोच्या अडचणीचा फायदा घेत तिकिट दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्याचबरोबर परिसरातील हॉटेलनीही आपले उखळ पांढरे करून घेत दर वाढवले. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली असून, जादा पैसे देऊनही विमान उड्डाणाला उशीर होत आहे. शुक्रवारी (दि. ५) इंडिगोची पुण्यात येणारी २१ आणि जाणारी २१ अशी एकूण ४२ उड्डाणे रद्द झाली. सात ते आठ तास विमान उड्डाणाची वाट पाहिल्यावर प्रवाशांना विमान रद्द झाल्याचे समजल्यानंतर ते चिडचिड करत होते. त्यानंतर प्रवासी लगेज घेण्यासाठी गेल्यानंतर विमान कंपनीने प्रवाशांची लगेज टाकून दिली होती. लगेज शोधण्यासाठी प्रवाशांना दोन ते चार तास फिरावे लागत होते. त्यामध्ये प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या या गोंधळाचा अन्य काही विमान कंपन्यांनी फायदा घेत तिकिट दरामध्ये वाढ केली होती. दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूसाठी पाच ते सहा हजार तिकिट असलेल्या ठिकाणी आठ ते दहा हजार तर काहींनी १२ ते १५ हजार रूपये तिकिट दर केले. शिवाय तिकिटासाठी जादा पैसे मोजूनही विमानासाठी तासन् तास वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली. यामुळे विमान प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला. बॅगा शोधण्यासाठी दोन तास पर्यटनासाठी दिल्लीला जाणार होतो. तेथून कनेक्टींग विमान होते. मात्र, दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर विमान रद्द झाल्याचे समजले. त्यामुळे सगळेच नुकसान झाले. कामानिमित्त पुण्यात आलो होतो, आता विमान रद्द झाल्यामुळे पुण्यात हाॅटेलमध्येच मुक्काम करावा लागला. विमान रद्द झाल्याचे सांगितल्यावर, आम्ही आमच्या बॅगा घ्यायला गेलो, मात्र त्या शोधण्यासाठी दोन तास गेले. याठिकाणी कर्मचाऱ्यांकडून म्हणावे असे सहकार्य मिळत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. इंडिगो कंपनीच्या तिकिट काऊंटरजवळ प्रवाशांची मोठी गर्दी झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ‘इंडिगो विमानाच्या गोंधळात अन्य विमान कंपन्या आणि विमानतळाजवळील हॉटेलनी भाड्यात अवाजवी वाढ करून प्रवाशांचे शोषण करण्याचा प्रयत्न केला, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. सरकारने केवळ प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर हस्तक्षेप करण्यापेक्षा, तत्काळ आणि सक्रिय पावले उचलून दर वाढ होऊ नये, यासाठी अंकुश ठेवणे अत्यावश्यक आहे.’ -धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ