प्रभात वृत्तसेवा पुणे – उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. अंतीम यादीस आणखीन दोन दिवस जातील, असे आघाडीतील सुत्रांनी सांगितले. ही यादी वरिष्ठांकडे जाणार, अंतीम होणार. त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागवाटपाची बैठक होईल. त्यामुळे आघाडीत कोणाला किती जागा मिळणार ? जागावाटप सुरळीत पार पडणार की, मिठाचा खडा पडणार याची धाकधूक आहे. दुसरीकडे आघाडीत आमच्या प्रभागात कोणत्या पक्षाला जागा सुटणार, आम्हाला संधी मिळणार का? या विचाराने इच्छुकांचे ब्लडप्रेशर वाढले आहे.शिवसेना-मनसे एकत्र निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर झाल्यावर शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. त्यानुसार मागील आठवड्यात डेक्कन येथील शिवसेना पक्ष कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत चहा-पान केले. त्यावेळी ४१ प्रभागातील इच्छुक उमेदवार, सध्याचे उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाची पडलेली मते याची माहिती घेऊन जागावाटपाच्या चर्चेला बसू अशी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीची बैठक होऊन आघाडीचा निर्णय झाला. त्यानंतर जागावाटपाबाबत बैठका सुरू झाल्या. मात्र, अजून ही बैठक काही संपेना. त्यामुळे शिवसेना-मनसे बैठक लांबणीवर गेली. महापालिकेत राष्ट्रवादी ३९, शिवसेने १०, काॅग्रेसच्या ९ तर मनसेच्या २ असे संख्याबळ होते. म्हणजेच ५८ जागा महाविकास आघाडीकडे असून, दोन जागांवर मनसे विजयी आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने जागा वाढवून मागितल्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना. त्यामुळे कोण किती जागा मागणार आणि कोणाच्या परड्यात किती जागा पडणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून मनसेला जागा मिळणार की, स्वतंत्र जागा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेकडून जादा जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. सध्या काही प्रमुख प्रभागांवर चर्चा सुरू असून, पुढील दोन ते तीन दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल असे बोलले जात आहे. त्यानंतर शिवसेना-मनसे बैठकीचे चित्र स्पष्ट होईल.