प्रभात वृत्तसेवा पुणे – हवामानातील बदलामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव या जिल्ह्यांत सर्वांत कमी ९ ते ११ अंशांच्या आसपास किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, अन्य जिल्ह्यांतील किमान तापमानात वाढ झाल्याने कडाक्याची थंडी कमी झाली आहे. मागील आठवड्यात विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमानात लक्षणीय घट झाली. परिणामी गायब झालेल्या थंडीचा कडाका पुन्हा सुरू झाला. पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळे यासह विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत थंडीची हलकीसी लाट आली. मात्र, ४८ तासांत हवामानात झालेल्या बदलामुळे किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली त्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. अहिल्यानगर येथे सर्वात कमी ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ मालेगाव, नाशिक जिल्ह्यात पारा १०.८, तर पुणे जिल्ह्यात ११.५, बीड येथे १०.५, धाराशिवमध्ये ११.९, तर यवतमाळ आणि नागपूर येथे ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, काही भागात थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.