प्रभात वृत्तसेवा पुणे – विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान होईल, असे जाहीर केले तरी तसे झाले नाही. महापालिका निवडणुकांमध्येही मतदार यादीतील घोळ कायम असून आयोगाचा सत्ताधाऱ्यांवर धाक राहिलेला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेवेळी केली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने, नीता राजपूत आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोज भाजपवर टीका करत असले तरी सत्तेसाठी भाजपला गोचीडासारखे चिकटून असल्याचा टोला लगावून ते म्हणाले, मुंढवा जमीन विक्री, जैन बोर्डिंग जमीन खरेदीत अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाला असून त्याचे समर्थन अजित पवार करत आहेत. पुणे आज ड्रग्ज, कोयत्यांसाठी ओळखले जात आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले नाहीत. केंद्राने दिलेले दोन कोटी रोजगारांचे आश्वासनही फसवे ठरले. पुण्यात मोफत मेट्रो व बससेवेची घोषणाही हवेतच विरल्याची टीकाही सपकाळ यांनी केली आहे.