प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येरवडा ते कात्रज दरम्यान 20 कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या भुयारी महामार्गाच्या व्यवहार्यता पडताळणीचे काम सुरू आहे. या कामासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांची निधी लागणार आहे. हा प्रकल्प झाल्यास पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडणारा एक वेगवान मार्ग उपलब्ध होणार आहे.पुण्यातील वाढती वाहनसंख्या पाहता जमिनीवर रस्ते रुंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे जमिनीखालील पर्यायांचा विचार करून हा २० कि.मी.चा बोगदा प्रस्तावित केला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागातून हा बोगदा जाणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूने वाहने ये-जा करू शकतील, हा बोगदा कोठून सुरू होणार, कोठून बाहेर पडता येणार, किती खर्च अपेक्षित आहे, तो कोणत्या महामार्गाना जोडणे शक्य आहे, प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर राबविता येईल का, या बोगद्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण किती कमी होईल, त्यासाठी किती खर्च येईल, आदी माहिती अहवालातून मिळणार आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार येरवडा ते कात्रज या 20 कि. मी. भुयारी मार्गासाठी तीन ठिकाणी इन आणि आउटचे पर्याय दिले जाणार आहेत. हा भुयारी मार्ग प्रस्तावित करताना भूमिगत मेट्रोला कोठेही बाधा येणार नाही, अशा पद्धतीने त्यांचे आरेखन करण्यात आले आहे. जमिनीखाली ३० मीटर अंतरावरून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गाची वैशिष्ठ्ये…. – वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत – भुयारी मार्गामुळे वेगवान वाहतूक, इंधन बचतही होणार – सातारा आणि नगर रस्त्याला जोडणारा अत्यंत प्रभावी पर्याय – शहराच्या सर्वात गजबजलेल्या मध्यवर्ती भागातून मार्ग जाणार – येरवडा ते कात्रज भुयारीमार्गे अंतर केवळ अर्धा तासात पार करणे शक्य – शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे थेट जमिनीखालून वाहतूक