प्रभात वृत्तसेवा पुणे – खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील पहिले आर्वतन सोडण्यास मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. सद्यः स्थितीत कालव्यातून एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून, हे आर्वतन सुमारे 40 ते 50 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या आर्वतनचा फायदा हवेली, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यांतील शेतीला फायदा होणार आहे. यंदा चांगल्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने धरणे 100 टक्के भरली. त्यानंतर परतीचा पाऊससुद्धा समाधानकारक झाला आहे. ग्रामीण भागातून शेतीसाठी रब्बीतील पिकांसाठी आर्वतन सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून ही मागणी मान्य करीत मागील आठवड्यापासून कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सध्या खडकवासला, टेमघर, वरसगाव, आणि पानशेत असे चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा 25 टीएमसी म्हणजे 85 टक्के इतका उपलब्ध आहे. शेतीला किती पाणी द्यायचे आणि शहराला पिण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे यानुसार शेती व पिण्याच्या पाण्याचे वर्षभराचे नियोजन कालवा समितीच्या बैठकीत होत असते. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होते. या बैठकीस शहरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, पालिका व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित असतात. कालवा समितीची बैठक साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होते. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता त्यानंतर डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे कालवा समितीची बैठक लांबणीवर गेली. त्यामुळे यंदा कालवा समितीच्या निर्णयाविनाच आर्वतन देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला.