प्रभात वृत्तसेवा पुणे – कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल या प्रभाग क्र. २४ मध्ये जुन्या पुण्याचे बरेचसे भाग आहेत. कोपरा सभा, प्रचार फेऱ्या, पदयात्रांमुळे होणारी वाहतूक कोंडी, फटाक्यांच्या माळा याला भाजपाचे उमेदवार गणेश बिडकर यांनी फाटा दिला आहे. केवळ प्रचाराचा शेवटचा दिवस वगळता एकही पदयात्रा न काढता घरोघरी संपर्क साधत आतापर्यंत बिडकर यांनी सुमारे ८ हजार घरांपर्यंत संपर्क केला आहे. अशा प्रचारामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासह, ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळल्यामुळे या नव्या पद्धतीस भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचाराचा ‘बिडकर पॅटर्न’ असे नाव दिले आहे. बहुतांश उमेदवार प्रमुख रस्त्यांवरून पदयात्रा अथवा उघड्या गाडीमधून प्रचार फेऱ्या काढतात. या वेळी घोषणा दिल्या जातात. फटाके वाजवले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वायू आणि ध्वनिप्रदूषण होते, ही बाब लक्षात घेऊन नियोजनबद्ध प्रचार सुरू केल्याचे नीलेश धायकर यांनी सांगितले. निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी ६०,००० नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला होता. आता दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील १५,००० घरांपैकी ५,००० घरे त्यांनी पूर्ण केली आहेत. त्या-त्या भागातील प्रतिष्ठित आणि प्रभावी व्यक्तींच्या दररोज १० कार्यकर्ते भेटी घेत आहेत. आणखी १० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बिडकर यांच्यासह प्रभागातील सर्व भाजप उमेदवार एकत्र प्रचार फेरी काढणार आहेत.