पुणे – राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक तयारीचा आढावा गुरुवारी घेण्यात आला. त्यानंतर महापालिकेत निवडणुकीसाठीच्या हालचालींना वेग आला असून, आठ दिवसांच्या आत मतदान केंद्रे अंतिम करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार निवडणूक विभागाकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदान केंद्रे तातडीने अंतिम करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले. महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख प्रसाद काटकर, मतदान केंद्र व्यवस्थापन उपायुक्त अरविंद माळी आणि गोविंद दांगट उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रात सरासरी ९०० मतदार ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने केंद्रांच्या ठिकाणी मतदारांसाठीच्या सुविधा, मतदान केंद्राची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधांची उपलब्धता याचा अहवाल तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ४ हजार ५० मतदान केंद्रे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून ४ हजार ५० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदार संख्येनुसार त्यांचे विभाजन करण्यात आले असून, एका केंद्रावर सरासरी ९०० मतदार ठेवण्याचे नियोजन आहे. महापालिकेने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून, त्यावर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्त्या केल्या जात आहेत. हे काम १० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर दुरुस्त केलेल्या मतदार याद्या अंतिम करून आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार १५ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार होणार असून, २२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर केली जाणार आहे. १८ ते २२ डिसेंबरपूर्वी संपूर्ण नियोजन महापालिका निवडणूक तयारी १८ ते २२ डिसेंबरदरम्यान पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीत महापालिका निवडणुका आधी होतील, की जिल्हा परिषद याबाबत कोणतीही स्पष्टता नसली, तरी ‘तयारी ठेवा’ असा संदेश देण्यात आला आहे. प्रशासनाकडून महापालिका निवडणुका जिल्हा परिषदेपूर्वी जाहीर होतील, असे गृहित धरून काम सुरू आहे. राज्याचे अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून, २१ डिसेंबर रोजी नगरपालिकांचा निकाल आहे. त्यामुळे २२ डिसेंबरनंतर कोणत्याही दिवशी पुढील टप्प्यातील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.