प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदारयादीत एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जाणे आणि मोठ्या प्रमाणात घोळ आढळल्यानंतर ही चूक निवडणूक आयोगावर ढकलण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून झाला. मात्र, मतदार यादीची जबाबदारी महापालिका आयुक्तांचीच असल्याचे स्पष्ट करीत निवडणूक आयोगाने प्रशासनास पत्राद्वारे सुनावले. त्यानंतर बुधवारी पालिकेत बैठक घेण्यात आली. याद्या बिनचूक करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची संपूर्ण यंत्रणा तातडीने कामाला लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे, पवनीत कौर, उपायुक्त प्रसाद काटकर तसेच मतदार यादी विभाजनासाठी प्राधिकृत अधिकारी उपस्थित होते. मतदार याद्यावरील हरकती, तक्रारींची शहानिशा करून दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले. तसेच, तीनही अतिरिक्त आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांनी प्रत्यक्ष प्रभागनिहाय जागेवर जाऊन याद्यांची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. इच्छुकां नी केलेल्या तक्रारींचीही दखल.. महापालिकेने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्यानंतर हरकती नोंदविण्याची अट फक्त वैयक्तिक मतदार किंवा सोसायटीपुरती मर्यादित ठेवली होती. त्यामुळे आपल्या प्रभागात त्रुटी आढळूनही इच्छुक उमेदवारांना हरकत नोंदविता येत नव्हती. यामुळे इच्छुक उमेदवारांनी आयुक्त आणि निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रारी पाठवल्या. मात्र, महापालिका प्रशासनाने यावर काही करता येणार नसल्याचे सांगितले होते. आता, निवडणूक आयोगाचे पत्र आल्यानंतर आयुक्तांनी या सर्व तक्रारींचीही पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेत लगबग.. निवडणूक आयोगाने मतदार यादीचे अधिकार थेट आयुक्तांना दिल्यानंतर प्रभागातील गोंधळाची माहिती घेण्यासाठी बुधवारी दिवसभर इच्छुकांनी महापालिकेत गर्दी केली. अनेकांनी आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादीतील चुका निदर्शनास आणून दिल्या आणि तातडीची दुरुस्ती करण्याची मागणी केली. काही इच्छुकांनी तर क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर आरोग्य निरीक्षकांच्या मदतीने अनुकूल मतदारांची हेराफेरी केल्याचे आरोपही केले. हरकती साडेतीन हजारांवर.. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरूवारी संपत असल्याने बुधवार पर्यंत हरकतींची संख्या तब्बल ३ हजार ४४३ झाली. आयोगाकडून मतदार यादीसाठी मुदतवाढ दिली असल्याने आता नागरिकांना ३ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. तर, आता अंतीम मतदारयादी ५ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे.