Education News – “मुलगी शिकली, प्रगती झाली” हे ब्रीदवाक्य आता केवळ भिंतींवर न राहता महाराष्ट्राच्या व्यावसायिक शिक्षणाच्या वर्गात प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. राज्य सरकारच्या १०० टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क सवलत योजनेमुळे राज्यातील उच्च शिक्षणाचे चित्र बदलले आहे. कधीकाळी मुलांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी क्षेत्रात आता मुलींनी मोठी मुसंडी मारली असून, अवघ्या तीन वर्षांत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत तब्बल २३ हजार ५६१ इतक्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च हा चिंतेचा विषय होता. मात्र, वार्षिक ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी राज्य सरकारने २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सुरू केलेली १०० टक्के शुल्क सवलत निर्णायक ठरली आहे. आर्थिक विवंचनेमुळे मागे पडणाऱ्या पावलांना या योजनेने बळ दिले आणि परिणामी, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वर्गांमध्ये आता मुलींची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे. विधी आणि आरोग्य क्षेत्रातही ‘लेकी’च पुढे Education News Education News मुलींना न्यायदानाचे क्षेत्रही आता मागे राहिलेले नाही. पाच वर्षांच्या विधी (लाॅ) अभ्यासक्रमात २०२५-२६ मध्ये ५३ टक्के विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. तर ‘बी.एड.’ अभ्यासक्रमात मुलींचे ७३ टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले आहेत. आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात तर मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. दंतचिकित्सा (बीडीएस), आयुर्वेद (बीएएमएस) आणि होमिओपॅथीमध्ये अनेक महाविद्यालयांत ६० ते ७५ टक्के प्रवेश मुलींचेच आहेत. एमबीबीएसमध्येही मुलींचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आली. अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचे वाढते प्रमाण Education News -२०२३-२४ : ३८,६३४ विद्यार्थिनी (३२.७२%) -२०२४-२५ : ५२,७५१ विद्यार्थिनी (३५.३९%) -२०२५-२६: ६२,१९५ विद्यार्थिनी (३७.३०%) “राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी शुल्कमाफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणात मुलींची संख्या लक्षणीय वाढली आहे. उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यत नेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. आता मुलींना शिक्षणासाठी प्राधान्य दिले पाहिजे, ही मानसिकता वाढू लागली आहे, ही बाब सकारात्मक आहे.” – प्रसेनजीत फडणवीस, सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ