पुणे : कल्याणीनगर भागात रविवारी दुपारी मद्यधुंद मोटारचालकाने पबमधील एका कर्मचाऱ्याला धडक दिली. अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारचालक एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. सत्येंद्र मंडल (वय ३०, मूळ रा. बिहार)असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक प्रतापसिंह कायंगडे ( वय ४९, रा. धानोरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘कायंगडे मूळचा नवी मुंबईतील आहे. तो नेरूळ भागातील एका सोसायटीात राहायला आहे. तो येरवडा भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. सध्या तो धानोरी भागात राहायला आहे. तो रविवारी दुपारी कल्याणीनगर भागातील एका पबमध्ये आला होता. तेथे त्याने मद्यप्राशन केले. दुपारी तीनच्या सुमारास तो पबमधून बाहेर पडला. पबमधील ‘वॅले पार्किंग’ मध्ये मोटार लावली होती. कायंगडेने मद्यप्रशान केले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील कायंगडेला कर्मचाऱ्यांनी मोटारीतून घरी जाऊ नका, असे सांगितले. ॲप आधारित मोटारीतून घरी जा, असे सांगितले.’, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सांगितले.