पुणे – महाराष्ट्राचे शिल्प अनेक नेत्यांनी घडवले असून, त्यात डॉ. पतंगराव कदम यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अनमोल आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘ महाराष्ट्राचे शिल्पकार : डॉ पतंगराव कदम’ आणि ‘ ज्ञानयात्रेचा पथिक ‘ या डॉ. महादेव सगरे लिखित दोन ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्राचार्य डॉ. महादेव सगरे, सहकार्यवाह डॉ. के.डी. जाधव, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.संजय ठिगळे, गोल्डनपेज पब्लिकेशनचे संपादक प्रदीप खेतमर उपस्थित होते. डॉ. मोरे पुढे म्हणाले, लोकांना नेता माहिती असतो पण त्याचे पूर्ण जीवनचरित्र माहिती नसते. प्राचार्य डॉ. महादेव सगरे यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथातून डॉ.पतंगराव कदम यांचा जीवनपट उलगडला असून त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश पुढील पिढीस प्रेरणादायी ठरणारा आहे. प्रा. जोशी म्हणाले, डॉ पतंगराव कदम यांनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत तर माणसे उभी केली. त्यांनी भारती विद्यापीठ आणि समाज यांच्यात कायम संवादाचे पूल उभे राहतील असे प्रयत्न केले. भारती विद्यापीठाने विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांना जी भरभरून मदत केली त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी सामान्य माणसांशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही. परिस्थितीची झळ सोसणाऱ्या अनेक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांचे जीवनशिल्प त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून घडविले. जे काम करायचे ते उत्तमच यासाठी ते कायम आग्रही असायचे. प्रास्ताविक प्रकाशक प्रदीप खेतमर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.आप्पासाहेब पाटील यांनी केले.