प्रभात वृत्तसेवा पुणे – जे लोक आम्हाला कामाचा हिशोब विचारत आहेत, त्यांनी एकदा आरसा पाहावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कात्रज चौक येथे प्रभाग ३८ मधील भाजपा-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, की, येत्या पाच वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलला जाईल. शहराच्या विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबवण्यात येतील. पुणे हे राज्याचे आर्थिक इंजिन असल्याचे नमूद करत फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांतील कामांचा पाढा वाचला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की अजितदादा अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते, मग तेव्हा त्यांना हा भरीव विकास का सुचला नाही? आता केवळ टीकेसाठी टीका करणे चुकीचे आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही अजित पवारांच्या दूरदृष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुणेकर विरोधकांना थारा देणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. या सभेत भाजपा-रिपाइं महायुतीचे प्रभाग ३८ मधील उमेदवार व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोरघे आणि अश्विनी चिंधे यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. व्यासपीठावर पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, शहरातील सर्व आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.