प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेने सर्व राजकीय आडाखे मोडीत काढत भारतीय जनता पक्षाला जे अनपेक्षित आणि अभूतपूर्व यश दिले आहे, ती आमच्यावरील विश्वासाची पोचपावती आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी महापौर निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मी स्वतः पुण्याच्या मैदानात उतरणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनियुक्त नगरसेवकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी काळातील भाजपची रणनीती आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, पुणेकरांनी नरेंद्र मोदींचे व्हिजन आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय जितका आनंदाचा आहे, त्यापेक्षा जास्त तो जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. संजय राऊतांना ‘खणखणीत’ टोला मुंबईतील निकालांवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी संजय राऊत यांचे नाव न घेता निशाणा साधला. “आम्ही मुंबईत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. तरीही काही लोक ‘गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी’ अशा आविर्भावात बोलत आहेत. अशा बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसते,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही मुंबईत पहिल्यांदाच स्वतंत्र लढताना चांगली कामगिरी केली असून, काही जागा केवळ अल्प मतांनी हुकल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईचा महापौर महायुतीचाच! उद्धव ठाकरे यांनी ‘देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर आपला होईल’ असे विधान केले होते. त्यावर मिश्किल टिप्पणी करीत मुख्यमंत्री म्हणाले, देवाच्या म्हणजे नक्की कुणाच्या? माझ्या की वरच्या देवाच्या? वरच्या देवाने तर ठरवलेच आहे की मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल. मुंबईचा महापौर कोण आणि किती काळासाठी असेल, याचा निर्णय मी आणि एकनाथ शिंदे बसून घेऊ. आमच्यात कोणताही वाद होणार नाही आणि आम्ही उत्तम पद्धतीने मुंबई चालवून दाखवू. ‘मनसे निवडणुकीतील बिगेस्ट लूझर’ राजकीय विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेवरही कडक टीका केली. ठाकरे बंधूंच्या या युतीत ‘बिगेस्ट लूझर’ कोणी असेल तर ती मनसे आहे, हे माझे भाकीत निवडणुकीने स्पष्ट केले आहे. या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असला तरी राज ठाकरेंना मात्र राजकीयदृष्ट्या मोठा फटका बसला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.