प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील दादागिरीची निवडणूक समजून काही लोक मनमानी आश्वासने देत आहेत.खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा, असा त्यांचा व्यवहार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मंगळवारी मारला.पुणे महापालिका निवडणुकीच्या महायुतीच्या ‘विजय संकल्प’ सभेची सांगता फडणवीस यांच्या सभेने झाली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेशसरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.लाडक्या बहिणी भाजपला विजयी करतील. त्यानंतर या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे आहे. महाराष्ट्रात ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. पुढील ४-५ महिन्यांत ही संख्या १ कोटीवर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. या मतदारसंघात पुढील वेळी येताना किती महिलांना लखपती दीदी केले, याचा हिशोब मी नगरसेवकांकडे मागेन. ज्यांना पदे हवी आहेत, त्यांनी जास्तीत जास्त लखपती दीदी घडवाव्यात. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल, असा अपप्रचार करत आहेत; पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.पुणे हे जागतिक दर्जाचे शहर असल्याचे सांगत त्यांनी विकासाचा लेखाजोखा मांडला. पुण्यात ११० किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यामध्ये शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून, याच वर्षी लोकार्पण होईल. शिवाजीनगर येथे मेट्रो आणि पीएमपीसाठी इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल हब तयार करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन पुणे साकारण्यात येत आहे. औद्योगिक उत्पादनांची निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान सेवा देणारे पुणे भारताच्या डिजिटल परिवर्तनाचा कणा आहे. पुण्यात ९० देशांतील लोक वेगवेगळ्या आस्थापनांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. शहराला स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, जुन्या वाड्यांचा पुनर्विकास, झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे घर, असा विकासाचा ठोस आराखडा आम्ही साकारला आहे. मागील काळात विकासाच्या नावाखाली काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने उड्डाण पुलाचे बांधकाम केले. त्यामुळे विद्यापीठ येथील उड्डाण पूल पाडावा लागला. आम्ही पुढील वीस वर्षांचे नियोजन करत आहोत, असे फडणवीस यांनी नमूद केले.