प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आघाडीने पुणेकरांचा अधिकारनामा असलेला पुणे फर्स्ट हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. आरोग्यदायी, आनंददायी, सुरक्षित जागतिक दर्जाचे राहणीमान पुणेकरांना देण्यासाठी आवश्यक ते विकास प्रकल्प उभारण्याचा निर्धार जाहीरनाम्यात केला आहे. त्यात वाहतुक कोंडी सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. कॉंग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री व पुण्याचे प्रभारी सतेज पाटील यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीसाठी पुणेकराचा अधिकारनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह अजित दरेकर,ॲड.अभय छाजेड, शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे आदी उपस्थित होते. पुणेकरांना किफायतशीर, सोयीस्कर, विश्वासार्ह, आरामदायी सेवा देण्यात येणार आहे.पीएमपीएमएलच्या ताफ्यात ५ हजार बस आणण्यात येणार आहेत. महिलांना विनामुल्य प्रवास मिळणार आहे. ६७८ मिसिंग लिंक रोडची कामे पुर्ण केली जातील. अतिक्रमणे हटवून ३२ महत्वाच्या रस्त्यांची स्थिती सुधारण्याची कामे केली जातील. मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष ठेवले जाईल. कार्यक्षम वाहतुक सिग्नल व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचेही जाहीरनाम्यात नमूद केले आले आहे. काय आहे पुणे फर्स्ट – खड्डेमुक्त रस्ते – प्रभागस्तवरावर कचरा व्यवस्थापन – प्रदूषणमुक्त पुणे – शुध्द पाणीपुरवठा – पालिकेच्या शाळांचा विकासात्मक कायापालट – गुन्हेगारांचा बंदोबस्त – मालमता करावरील दंड व्याज १ टक्क्यांवर – २५ वर्षाचा विकास आराखडा बनविणार – पारदर्शक कारभाराची ग्वाही – मध्यमवर्गींना विकासातुन कराचा पुर्ण परतावा – पुण्याला पर्यटनाची राजधानी बनविणार – युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना