प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुका वेळेवर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी दिवसभरात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढण्यासाठी तब्बल २ हजार इच्छुकांनी अर्ज घेतले. त्यामुळे भाजपकडे शहरात सरासरी एका जागेसाठी तब्बल २० जण इच्छूक असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी झाल्यानंतर सोमवारी अर्जवाटपास सुरूवात झाली आहे. त्यानंतर सोमवारी रांगा लावून भाजपचा अर्ज इच्छुक घेत होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅग्रेस, काॅग्रेस आणि शिवसेनेकडूनही अर्ज मागविण्यास सुरूवात केली असून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शहरात महापालिकेसाठी सर्व प्रमुख पक्षांकडे किमान ३ ते साडेतीन हजार इच्छूक असल्याचे चित्र आहे. मविआकडेही गर्दी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अर्जांचे वाटप सर्वात आधी केले होते. त्यांच्याकडे आतापर्यंत १४५ जागांसाठी २६० अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाकडून अर्जासोबत खुल्या गटासाठी १० हजार रूपये,तर एससी आणि एसटी प्रवर्गाच्या जागांसाठी ७ हजार रूपये शुल्क आकारले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही अर्ज मागवले आहेत. त्यांनीदेखील उमेदवारी अर्जासाठी तब्बल साडेदहा हजार रुपये शुल्क आकारले आहेत. आतापर्यंत तब्बल २०० इच्छुकांनी अर्ज घेतल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. काॅग्रेसकडून उद्या ( दि. ९ ) पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्जाचे वाटप. तसेच अर्ज स्विकारले जाणार असून त्यांच्याकडूनही खुल्या गटासाठी सात हजार रूपये तसेच एससी, एसटी प्रवर्गासाठी आणि ५ हजार रूपये शुल्क निश्चित करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्जांसाठी विचारणा होत असून सर्व जागांसाठी उमेदवार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रिपाईनेही मागविले अर्ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज वाटप केले जाणार असल्याचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे शुल्क सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आजपासून अर्ज वाटपास सुरूवात केली आहे. दिवसभर पक्षाकडून २०० अर्जांचे इच्छुकांना पक्षाच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे व पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी वाटप केले. सकाळपासूनच पक्षाकडे अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. पक्षाकडून अर्ज भरताना खुल्या आणि ओबीसींसाठी २० हजार रूपयांचे शुल्क निश्चित केले आहे तर एससी आणि एसटीसाठी १०हजार रूपये शुल्क असणार आहे. उमेदवारी अर्जाची किंमत ५०० रूपये ठेवण्यात आली आहे.