Consumer Court – अपघातग्रस्त ट्रकच्या नुकसानाची तुटपुंजी भरपाई देणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला. कंपनीने भरपाईचे ४१ हजार २७१ रुपये वार्षिक सात टक्के व्याजासहित चालकाला द्यावे; तसेच वाहनाच्या टोइंगसाठी आलेला ४५ हजारांचा खर्चही चालकाला द्यावा, असे आदेश आयोगाने दिले आहेत. विमा कंपनीने सदोष ग्राहक सेवा दिल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर व सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी अनिल देवकाते (रा. बिबवेवाडी) या चालकाने दाद मागितली होती. त्यांच्यातर्फे ॲड. राहुल आलुरकर व ॲड. प्रसाद आलुरकर यांनी बाजू मांडली.तक्रारदार आठ मार्च २०१४ रोजी ट्रक घेऊन गोव्यातून कोल्हापूरमार्गे पुण्याकडे येत होते. राधानगरी येथे पहाटे पुढे असलेल्या तेलाच्या टँकरने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्यांचा ट्रक टँकरला धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला. तक्रारदारांनी कोल्हापूर पोलिसांना आणि विमा कंपनीच्या पुणे व्यवस्थापकाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर कंपनीने सर्वेक्षकामार्फत वाहनाची तपासणी करून अपघाताची चौकशी केली. अपघातग्रस्त वाहन टोइंग करून पुण्यात आणण्यासाठी तक्रारदारांनी ४५ हजार रुपये खर्च केले. दुरुस्तीसाठी साडेचार लाख खर्चाचा अंदाज गॅरेजने दिला. त्यानुसार, तक्रारदारांनी दावा केला. मात्र, विमा कंपनीने सर्वेक्षकाच्या अहवालाच्या आधारे फक्त ८० हजार भरपाई तक्रारदारांच्या सहमतीशिवाय खात्यात जमा केली. विमा कंपनीने सर्वेक्षकाचा अहवाल दाखल केला नाही; तसेच ग्राहक सेवेत त्रुटी ठेवली, असा निष्कर्ष काढून आयोगाने वरील निकाल दिला.आणखी ४१ हजार आणि तक्रारदारांना झालेल्या त्रासाची भरपाई, खर्चापोटी १७ हजार देण्याचे आदेशही आयोगाने दिले.