प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ऐन वेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाल्याने काँग्रसने पुण्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रदेश काँग्रेसने पुण्यातील आघाडीबाबत घेतलेल्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या बाबतचे आदेश दिले आहे. तसेच, पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा सोबत अन्य समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास सहमती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीवरून काँग्रेसमध्ये मतभेद… राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्यावरून दोन गट असल्याचे समोर आले. या बैठकीस असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असून दोन्ही राष्ट्रवादी सोबत एकत्र लढल्यास भाजपला रोखणे शक्य असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी त्यास विरोध केला. काँग्रेसची विचारधारा स्वतंत्र आहे. भाजप हा पक्षाचा प्रमुख राजकीय शत्रू असून आतापर्यंत भाजपच्या विचारधारेला काँग्रेसने विरोध केला आहे, अशा वेळी राज्यात भाजप समवेत असलेल्या राष्ट्रवादी सोबत जाणे संयुक्तिक होणार नाही तसेच निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा घेऊन पुन्हा महापालिकेत सत्तेत जाईल. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास आघाडीस विरोध केला, त्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसने पुण्यात स्वबळावर लढावे, असे आदेश दिले आहेत. ठाकरे सेने सोबत चर्चेस मुभा… पक्षाकडून राष्ट्रवादी सोबत जाण्यास नकार देण्यात आला असला तरी दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे पक्षाशी चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. मुंबईत मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. ते पुण्यातही एकत्र येणार असले तरी पुण्यातही मनसे सोबत युती न करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस पुण्यात ठाकरे गटा सोबतही आघाडी करण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पुण्यात राष्ट्रवादी सोबत आघाडी करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आमच्या सोबत आघाडी करायची असल्यास त्यांनी राष्ट्रवादी सोबत जावू नये. आम्हाला स्पष्ट सूचना असल्याने आमची शिवसेने सोबत आघाडी होईल. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही. – अरविंद शिंदे , शहराध्यक्ष, काँग्रेस काँग्रेसने त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. अद्याप दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर उद्या ( शुक्रवारी) पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यांची भूमिका जाणून घेवून पक्षाच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल. – अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)