प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी अधिकृत आघाडी केली आहे. दोन्ही पक्षांची एकमेकांशी चर्चा करुन त्या-त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचाही निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खजिनदार ॲड.अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शन तेलंग, विशाल गवळी यांची काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद झाली. यामध्ये आघाडीबाबतची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ७३ जागा व पंचायत समितीच्या १४६ जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणुन प्रशांत जगताप, ॲड.अभय छाजेड, विशाल गवळी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आघाडी करताना दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांशी चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवले आहेत. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी त्यास मान्यता दिली आहे. नामांकन पत्र दाखल केल्यानंतर या आघाडीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी आघाडी झाली असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी वर्गाच्या शेतमालाला योग्य तो हमी भाव मिळत नाही. रस्त्यांची सर्वत्र दुरवस्था झाली असून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. महायुतीनी चुकीच्या कारभार केल्याचा नागरिकांना मोठा फटका बसला आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. प्राप्त परिस्थितीत काही ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवारांना पुरस्कृत केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ॲड.अभय छाजेड यांनी सांगितले आहे.