पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराला वेग आला आहे. पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून त्या मतदारांशी थेट संवाद साधत असून, आपल्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळातील विकासकामांचा आणि मंजूर करून घेतलेल्या ठरावांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. प्रचारादरम्यान पाटील म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत रस्ते, पाणी यांसह सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ठोस काम केले. काशेवाडीतील राजीव गांधी हौसिंग सोसायटीतील (एस.आर.ए. प्रकल्प) रहिवाशांवर थकीत वीज बिलाचा मोठा बोजा होता. त्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करून सोसायटीचे २ कोटी २८ लाखांचे सामाईक वीज बिल पालिकेमार्फत भरण्याचा ठराव मंजूर करून घेतला. महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधत, मेहतर कामगारांसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या उचल रकमेत वाढ करून ती ८ हजारांवरून १२ हजार करण्याचा निर्णय आपल्यामुळे घेण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदर येथे पालिकेच्यावतीने भव्य शिल्प उभारण्याच्या प्रस्तावाला तसेच कोरोना काळात पालक गमावलेल्या अनाथ मुलांचा खर्च राज्य शासनाने करावा, या ठरावाला मान्यता मिळवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.