प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्य २४ तासांत किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढू लागला आहे. विशेषत: माळीण, पाषाण, शिवाजीनगर परिसरातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली तर अन्य भागात दोन-तीन अंशाने घट झाली. पुढील दोन दिवसात शहरातील किमान तापमानात आणखीन घट होईल आणि थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पारा पुन्हा १० अंशाच्या खाली येणार आणि थंडीचा कडाका वाढणार.मागील आठवडाभरात किमान तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने शहरासह उपनगरातील थंडीचा कडाका कमी झाला होता. त्यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात थंडी जाणवत नसली तरी उपनगरातील एनडीए, पाषाण, वारजे, धायरी, नांदेड फाटा, आंबेगांव, कात्रज, जांभूळवाडी, औंध परिसरात थंडी चांगलीच जाणवत होती. पहाटे धुक्यांची चादर आणि ढगाळ वातावरणामुळे सकाळी दहा ते अकरापर्यंत गारवा जाणवत आहे. त्यात गेल्या २४ तासात किमान तापमानात घट झाल्यामुळे रविवारी (दि. ७) माळीण येथे सर्वात कमी ११.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाषाण येथे १२.४, तर शिवाजीनगर येथे १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे आज दुपारी उन्हाचा हलकासा चटका जाणवत होता. रात्री पुन्हा थंडीचा जोर वाढलेला होता. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. आजचे किमान तापमान पाषाण १२.४, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क १६.६, चिंचवड १७.३, बारामती १२.९, दौंड १२.७,तळेगाव दाभाडे १३, शिरूर १३.८, आंबेगांव १४.१, भोर १५.३, माळीण ११.८