पुणे – मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतील किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आल्यामुळे कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत थंडीची लाट आली असून, अहिल्यानगर जिल्ह्यात आज सर्वांत कमी ७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानातील बदलामुळे मागील आठ दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर कमी झाला होता. गारठलेला मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान ७ अंशांवरून १४ ते १५ अंशांवर जाऊन पोहोचले, तर मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान १३ अंशांवर होते. मात्र, गेल्या ४८ तासांत विदर्भातील नागपूर, गोंदिया, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे विदर्भात कडाक्याच्या थंडीला सुरवात झाली. त्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक आणि मालेगाव जिल्ह्यांतही किमान तापमानात लक्षणीय घट झाली. आज पारा झपाट्याने खाली आल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आली. परिणामी कडाक्याची थंडी जाणवू लागली. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्यातील हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार असून, त्यानंतर एक ते दोन अंशाने घट होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत थंडीची लाट येईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील किमान तापमान अहिल्यानगर ७.४, जळगाव ८.४, गोंदिया ८.६, नागपूर ८.८, पुणे ८.९, नाशिक ९.३, मालेगाव आणि यवतमाळ ९.२, अकोला आणि अमरावती १०.६, वाशिम १०.८, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी ११, सातारा आणि वर्धा ११.२, चंद्रपूर ११.६, धाराशिव, ब्रह्मपुरी आणि महाबळेश्वर १२ अंश सेल्सिअस.