प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात मागील ४८ तासांत फारसा बदल झालेला नसून, थंडीचा कडाका कायम आहे. बुधवारी (दि. ३) हवेली परिसरात सर्वांत कमी ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, कमाल तापमानात घट आणि ढगाळ वातावरणामुळे शहरासह उपनगरांत दुपारीही गारवा जाणवत होता. चार ते पाच दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान ७ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडीची लाट आल्यासारखी परिस्थिती होती. परिणामी दहा दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली आणि थंडीचा कडाका वाढेल, असे वाटत होते. मात्र, किमान तापमानात घट होण्याएवजी दोन ते तीन अंशाने वाढ झाली आणि थंडीचा जोर काहीसा कमी झाला. गेल्या ४८ तासांत किमान तापमानात कोणताही बदल झाला नसला, तरी पहाटे धुके, दिवसभर ढगाळ वातावरण आणि कमाल तापमानात घट झाल्यामुळे दुपारीही हवेत गारवा जाणवत असून, पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात काही अंशी घट होईल आणि हवामान कोरडे राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान हवेली ९.७, माळीण १०.२, तळेगाव दाभाडे आणि पाषाण ११, शिवाजीनगर ११.५, दौंड आणि निमगिरी ११.७, आंबेगाव ११.९, बारामती १२.३, भोर १४.३, कोरेगाव पार्क १५.३, चिंचवड १५.४, वडगावशेरी १६.४, मगरपट्टा १६.७ अंश सेल्सिअस.