प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा पारा ७ अंशापर्यंत खाली आला आहे. परिणामी जिल्ह्यातील बारामती, माळीण तर शहरातील पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात पुन्हा थंडीची लाट आली .मागील आठवड्यात शहरासह उपनगरातील किमान तापमान १० ते ११ अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, गेल्या ४८ तासांत किमान तापमानात एक ते दीड अंशाने घट झाली. शुक्रवारी तापमान झपाट्याने दोन ते तीन अंशाने घटले आणि थंडीचा कडाका वाढला. गुरुवारी रात्रीपासून हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणेकर गारठले असून, शहरातील पाषाण येथे ७.७ तर शिवाजीनगर येथे ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील बारामती येथे ७.४, माळीणमध्ये ७.७ तर दौंड येथे ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीचा काडाका कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. किमान तापमान माळीण -पाषाण ७.७, दौंड ८, शिवाजीनगर ८.३, तळेगाव दाभाडे ९.१, आंबेगाव ९.४, निमगिरी १०.७, हडपसर १०.७, कोरेगाव पार्क १३, चिंचवड १३.९, मगरपट्टा १४.४, वडगावशेरी १४.९, बारामती ७.४