प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील पारा घसरला असून, थंडीची लाट पसरली आहे. बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमान ९ ते १० अंशापर्यंत खाली आले आहे. पुढील ४८ तासांत धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे, त्यामुळे हुडहुडी भरविणारी कडाक्याच्या थंडी पडणार आहे. हवामानातील बदलामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. १५ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले किमान तापमान आज ९ अंशापर्यंत खाली आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आज सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान १० ते ११ अंशाच्या आसपार असल्याने थंडीचा जोर चांगलाच जाणवत आहे. पुढील पाच ते सात दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यासह घाट विभागात पुढील दोन दिवस थंडीची लाट येईल. तसेच, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात घट होईल. तसेच, विदर्भात दोन ते तीन दिवसांत काही अंशी वाढ होईल तर त्यानंतर पुन्हा किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान अहिल्यानगर ९.४ अंश सेल्सिअस, पुणे आणि नाशिक १०, बीड १०.३, मालेगांव १०.४, जळगांव आणि यवतमाळ १०.८, वाशिम ११, सातारा ११.९, छत्रपती संभाजीनगर ११.६, नागपूर १२, महाबळेश्वर १२.२, अमरावती १२.५, वर्धा १२.८.