प्रभात वृत्तसेवा पुणे – भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकसित पुण्याची मुहूर्तमेढ रोवली असून, पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ- नाना पेठ) मधील उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन भाजपचे राज्याचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या प्रभागातील भाजपच्या अधिकृत उमेदवार ॠतुजा तेजस गडाळे, पल्लवी जावळे, अनुराधा मंचे, विशाल धनवडे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.ही निवडणूक कचेरी प्रभाग समस्यामुक्त करण्यासह, भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या सुमारे १०० हून अधिक योजनांचा लाभ प्रभागातील नागरिकांना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार हेमंत रासने, भाजपा महामंत्री राजेशजी पांडे, भाजयुमो प्रदेश सचिव तेजस गडाळे, कसबा विधानसभा समन्वयक राजेंद्र काकडे प्रभाग अध्यक्ष सनी पवार, तसेच सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बावनकुळे यांनी केंद्र शासन, राज्य शासन, महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. हे उमेदवार कसबा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.