प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच; शनिवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यातील घोषणेवरून भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून येणारे अजित पवार पुणेकरांना मोफत पीएमपी, मेट्रो कशी देणार? मोफत प्रवासाचा निर्णय घ्यायचा असेल, तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणावा लागेल, तसेच त्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असे असेल, पाटील यांनी सुनावले आहे. पाटील म्हणाले, धोरणात्मक व आर्थिक निर्णय हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतात. पीएमपी व मेट्रोच्या मोफत प्रवास योजनेची घोषणा केली असली, तरी अजित पवारांना आपण विजयी होणारच नाही, हे माहिती असल्यानेच असे बोलण्यासाठी त्यांचे काही जात नाही.पवार यांनी बार्टी, सारथी, आर्टी यांच्या शिष्यवृत्तीवर मोठा खर्च होत असल्याचे विधानसभेत सांगितले, ७८ शिक्षण संस्थांचे अनुदान पुन्हा सुरू करण्याची फाइल १२० वेळा पवारांनी परत पाठवली. ५ हजार ५०० प्राध्यापकांच्या भरतीची फाइल मंजूर करून घेण्यासाठी आम्हाला त्यांच्यापुढे डोकं आपटावे लागले. पैसे नसल्याचे कारण देऊन मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून ठेवलेली होती. अशा वेगवेगळ्या घटनांचा हवाला देत पाटील यांनी पवार यांच्या कारभारावर टीका केली. भाजप ११५ जागा जिंकेल या पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांनी भारतीय जनता पक्ष पुण्यात ११५ जागा जिंकेल, असा दावा केला आहे, तसेच पुण्यात भाजपचाच महापौर होणार असून, त्यासाठी विविध प्रभागानुसार महापौरपदासाठीची नावेही निश्चित असल्याचा दावा पाटील यांनी या वेळी केला. याशिवाय पुण्यात भाजपला बहुमत मिळाले, तरी पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत महापालिका निवडणुकीनंतरच्या राजकीय गणितांचे सूतेवाच केले. याबाबतचा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. त्या वेळी पाटील यांनी ही माहिती दिली. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता असून, एका बाजूला पुण्यात महापालिकेतील सत्तेसाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोट बांधून उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करत असतानाच पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे.