प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता केवळ जात प्रमाणपत्र असून चालणार नाही, तर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राखीव जागांवर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोहोच देणे आवश्यक असते. त्यामुळे आता उमेदवारांची पडताळणी समितीकडे अर्ज करण्याची धावपळ सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक आहे; तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागणार आहे. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार असल्याचेही राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.