प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपने महायुतीच्या जागा वगळता इतर १४० ते १४५ उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. ही यादी आता जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने भाजप पहिली यादी रविवारी तर नंतर बाकीच्या दोन याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी तीन टप्प्यात यादी जाहीर करण्याची खेळी केली आहे. भाजप २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३० ते ४० माजी नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हे इच्छुक दोन्ही राष्ट्रवादी तसेच काॅग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, त्यांची कोंडी करण्यासाठी ही खेळी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. उमेदवार यादी अंतीम पुण्यातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शहर पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून होते. शुक्रवारी संध्याकाळी ही चर्चा संपली असून पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. हे पदाधिकारी पुण्यात परतले असून त्यांच्याकडून तिकिट निश्चित असलेल्या तसेच पहिल्या यादीतील उमेदवारांना प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्याची चर्चा आहे. यानुसार अनेकांनी सोशल मिडीयावर प्रचाराचा नारळ फोडला आहे. असे सुमारे ४२ ते ६२ उमेदवार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, फोन न गेलेल्या उमेदवारांची चलबिचल सुरू असून अनेक इच्छुकांनी दोन दिवस मुंबईत तळ ठोकत ओळखीच्या नेत्यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला आहे. युतीकडे लक्ष ? पुण्यात भाजप, रिपांई आणि शिवसेना युती म्हणून लढणार आहेत. भाजपकडे रिपाईने दहा जागांची मागणी केली असली तरी भाजपकडून त्यांना पाच ते सात जागा दिल्या जाणार आहेत. याशिवाय, शिवसेनेला १५ जागा देण्याची तयारी दर्शविली असून त्यात आणखी तीन जागांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, भाजपने तूर्तास शिवसेना सोबत असल्याचे गृहीत धरूनच आपल्या उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. आता शिवसेनेकडून ३५ जागांची मागणी करण्यात आलेली असून जागावाटपात सन्मानाने जागा न मिळाल्यास युतीतून बाहेर पडून मैत्रीपूर्ण लढण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे भाजपकडून युतीच्या चर्चेवर लक्ष ठेवण्यात आले असून युती न झाल्यास संबधित प्रभागांसाठीही पक्षाने उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली असल्याचे सांगण्यात येत आहे.