प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी सुमारे १२०० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळपासून सोमवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीवर भर देण्यात आला. दरम्यान, सोमवारच्या कार्यक्रमात इतर पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार की नाही, ही बाब गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाकडून आगामी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. पक्षाकडून २५०० हून अधिक अर्ज नेण्यात आले. तसेच, २३०० हून अधिक अर्ज भरून सादर करण्यात आले. त्यानंतर शनिवारी सुमारे ९०० तर रविवारी सुमारे १२०० इच्छुकांच्या मुलाखती शहर कार्यालयात घेण्यात आल्या. शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा लडकत यांनी या मुलाखती घेतल्या. काही कुटुंबातील व्यक्तींनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्या कुटुंबातील सर्वांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात आल्या. रविवारीही मुलाखती तीन-चार मिनिटांत उरकून टाकल्या. दोन दिवसांत सुमारे २१०० हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्व उमेदवार तयारीनिशी आले होते. भाजप लोकशाहीवादी पक्ष असल्याने लोकशाही परंपरा आणि संकेतांना अनुसरून निवड प्रक्रिया पार पडेल, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. अन्य पक्षातून येणाऱ्यांची नावे गुलदस्त्यात भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अन्य पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. यात माजी महापौर, उपमहापौर, त्यांचे कुटुंबीय, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय तसेच माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यातील अनेकांनी अर्ज नेले आहेत मात्र त्यांना मुलाखतीसाठी बोलावले नाही. त्यामुळे त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, सोमवारचा कार्यक्रम महापालिकेचा असल्याने, यावेळी कोणाचेही प्रवेश होणार नाहीत, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्पष्ट केले.