प्रभात वृत्तसेवा पुणे – थंडीचा पारा आणखीन एक अंशाने घसरल्याने शहरासह जिल्ह्यातील थंडीची लाट वाढली आहे. जिल्ह्यातील बारामती येथे सर्वात कमी ७.५ तर शहर परिसरातील पाषाण येथे ७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहरासह जिल्हा गारठला असून, पुढील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. मागील आठवडाभरापासून शहरासह उपनगरातील थंडीचा पारा दिवसेंदिवस खाली येत आहे. १२ ते १३ अंशावर असलेले किमान तापमान गेल्या ४८ तासांत ८ ते ९ अंशापर्यंत खाली आले. तर गुरुवारी (दि. ११) किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाल्यामुळे पारा ७ अंशाच्या खाली आला आणि थंडीची लाट आणखीन वाढली. त्यामुळे पहाटे धुक्याचे प्रमाण आणि हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणेकर गारठले आहेत. दिवसभर ऊन असले तरी एनडीए, पाषाण आणि हवेली परिसरात गारवा जाणवत होता. बारामती, पाषाण, माळीण आणि शिवाजीनगर परिसरांमध्ये किमान तापमान ७ अंशाच्या खाली तर दौंड, तळेगाव, आंबेगाव येथे ८ अंशापर्यंत नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी चांगला गारठा होता. पुढील दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील, धुक्याचे प्रमाण वाढेल तर दिवसभर आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नसली तरी थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. बारामती ७.५, पाषाण ७.७, माळीण ७.८, शिवाजीनगर ७.९, दौंड ८.४, तळेगाव ८.८, आंबेगाव ८.९, शिरूर ९.१, निमगिरी १०.१, कोरेगाव पार्क १२.७, भोर १३, चिंचवड १४.१, वडगावशेरी १५.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.