प्रभात वृत्तसेवा पुणे – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या; परंतु वडील किंवा पतीचे छत्र हरपलेल्या महिलांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीमुळे अनेक महिलांची अडचण होत होती. आता या महिलांना मृत्यू प्रमाणपत्र किंवा तत्सम कागदपत्रे सादर केल्यास या जाचक अटीतून विशेष सूट मिळणार आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, ज्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत; अथवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने ई-केवायसी पूर्ण करता येत नव्हती. यामुळे पुढील हप्ता मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. या समस्येवर तोडगा काढत शासनाने विशेष सुविधा जाहीर केली आहे. त्यानुसार संबंधित महिलांनी प्रथम स्वतःची ई-केवायसी पूर्ण करावी. त्यानंतर पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत ३१ डिसेंबरपूर्वी संबंधित अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी. अंगणवाडी सेविका कागदपत्रांची शहानिशा करून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे शिफारस करतील. त्यानंतर संबंधित महिलांना पती/वडील यांच्या ई-केवायसीतून अधिकृत सूट दिली जाईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.