Bhimashankar Temple : नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत: दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखडा या विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आलेली आहे. नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची कामे सध्या प्रगतिपथावर असून कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यामागचे कारण काय? कुंभमेळ्याच्या वेळेस भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जूना सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. मुख्य सभामंडप पुर्णत उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडप तयार करताना श्री भिमाशंकर येथे रोज होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर दर्शनासाठी बंद केल्याशिवाय सदरील काम करणे शक्य होणार नव्हते. Bhimashankar Temple कामांचे स्वरूप, परिसरातील भौगोलिक परिस्थिती व भाविकांच्या मोठ्या संख्येचा विचार करता, बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे आणि कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांच्या सोयीचा विचार करून महाशिवरात्री कालावधी (दि. 12 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 फेब्रुवारी 2026) वगळण्यात आला होता. श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे जास्त पावसाचे प्रमाण असते. या कालावधीत बांधकाम कामे करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे विकास कामांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. Bhimashankar Temple : वरील सर्व बाबींचा विचार करून पूर्वी महाशिवरात्री कालावधीत मंदिर खुले ठेवण्याच्या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला असून, दि. 12 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 फेब्रुवारी 2026 या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे. Sanjay Raut : मुंंबईतील बांगलादेशी रोहिंग्यांना बाहेर काढणार; रितू तावडेंचा इशारा, आता संजय राऊत म्हणाले….