प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मोक्का लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मोक्का लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षात गुटखा उत्पादकांवर मोक्का लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.यापूर्वी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार हार्म आणि हर्ट, या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मोक्का लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अधिवेशानत दिली होती. त्यानुसार नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग कामाला लागले आहे. गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणणार, कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव आणण्यात येणार आहे. गुटखा बंदी कायदा कठोर करण्यासाठी व मोक्का लावण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करून सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.