प्रभात वृत्तसेवा पुणे – लोहगाव विमानतळ आणि औंध परिसरात दिसलेला बिबट्याने पुन्हा दर्शन दिले नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. बिबट्याचा थर्मल ड्रोनच्या मदतीने शोध सुरू असून नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा वनविभागाने दिला आहे. विमानतळ परिसरात वनविभाग आणि हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी संयुक्त पाहणी केली. रविवारी रात्री वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमने जेथे बिबट्या असू शकतो, अशा भागात थर्मल ड्रोनच्या मदतीने, तसेच पायी आणि वाहनांद्वारे गस्त घालून शोधमोहीम राबवली. मात्र, अद्याप तरी कोणत्याही कॅमेऱ्यात संबंधित बिबट्या पहाटे चार वाजल्यानंतर दिसून आला नाही. तसेच त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत, तसेच तो असल्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षदर्शी पुरावे सापडले नाहीत. तरीही नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. विमानतळ परिसरात दिसलेल्या बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी सकाळी संयुक्त क्षेत्रीय भेट देण्यात आली. या भेटीत पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे; भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर वाय. एस. सिंग; रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश वरक; राउंड ऑफिसर शीतल खेंडके आणि प्रमोद रासकर; आणि रेसक्यू फाउंडेशनचे प्रतिनिधी किरण रहाळकर आदींचा समावेश होता. यावेळी पथकाने के ४ स्थानाची पाहणी केली. या भागातच पूर्वी बिबट्या दिसला होता. सध्या, त्याठिकाणी तीन कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. तथापि, १९ तारखेच्या सकाळनंतर बिबट्या दिसलेला नाही. यामुळे तो कोणत्याही कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेला नाही.या परिसरातील विविध खड्डे आणि कपारींची सखोल तपासणीदेखील करण्यात आली. भारतीय हवाई दलाने आता खोल कपारी पूर्णपणे सील केल्या आहेत, जेणेकरून बिबट्या त्यांच्या आत लपणार नाही याची खात्री होईल. तरीही, हा प्राणी आजूबाजूच्या झाडीत लपला असण्याची शक्यता जास्त आहे.थेट किंवा कॅमेरा ट्रॅप फुटेजद्वारे जर बिबट्या पुन्हा दिसला तर पिंजरा बसवण्याबाबत आणि त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी योग्य पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला जाईलल, असे यावेळी ठरविण्यात आले. अफवावर विश्वास ठेऊ नका काही नागरिक एआय च्या मदतीने बनावट फोटो तयार करून समाजात अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. अशा प्रकारे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती, फोटो किंवा मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवू नयेत. अन्यथा त्यांच्यावर शासकीय नियमावली आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशा इशारा वनविभागाने दिला आहे. वन विभाग आणि रेस्क्यू टीम सातत्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा माहिती मिळाल्यास तात्काळ १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर कळवावी, असे आवाहन केले आहे.