प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसली नाही, तरी काँग्रेस ही लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या, तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे आज भाजपमध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली, तरी पक्षाची ताकद कायम आहे. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर,सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते.निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल करणे, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून, त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी, पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शासनाची तिजोरी ही जनतेच्या पैशांतून तयार होते. सत्तेवर जाणाऱ्यांनी विकासकामांना प्राधान्य देऊन त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य यासाठी व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.