Bopdev Ghat : पुणे आणि सासवडला जोडणाऱ्या बोपदेव घाटातील रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामामुळे हा मार्ग गुरुवार, ८ जानेवारी ते १४ जानेवारी या सात दिवसांच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, बोपदेव घाटात सध्या रस्त्याचे विस्तारीकरण आणि खडीकरणाचे काम सुरू आहे. कामाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता, या काळात दुचाकी, चारचाकी किंवा कोणतीही एकेरी वाहतूक सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे हा रस्ता पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांना ‘वळसा’; ‘हे’ असतील पर्यायी मार्ग- बोपदेव घाट बंद असल्यामुळे पुरंदर आणि सासवड भागातून पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सासवड-पुणे प्रवासासाठी दिवे घाट मार्गाचा वापर करावा. सासवड-पुणे प्रवासासाठी नारायणपूरमार्गे कापूरहोळ किंवा चिव्हेवाडी घाट मार्गाचा अवलंब करावा. सासवड-कोंढवा प्रवासासाठी बोपदेव घाट हा सर्वात जवळचा आणि जलद मार्ग मानला जातो. मात्र, आता हा मार्ग आठवडाभर बंद राहणार असल्याने नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढणार आहे. विशेषतः कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील नागरिकांना आता दिवे घाटातून मोठा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. “रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा,” असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग (हवेली २) चे शाखा अभियंता देवेन मोरे यांनी केले आहे.