प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील ८५.५ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तर ९५ टक्के विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली आहे. अद्यापही २९ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार करण्यासाठी नोंदणीच केली नसल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करणे, आधार पडताळणीबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी यू-डायस प्लस प्रणालीमार्फत काढण्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना अपार आयडी प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांचे डिजिटल पद्धतीने चाइल्ड ट्रैकिंग, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अशा बाबीचे संनियंत्रण करता येणार आहे. १ जानेवारी २०२६ रोजीच्या यू-डायस प्लस प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यातील १ कोटी ८४ लाख विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यात आला आहे तर २ कोटी ४ लाख विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली आहे. आकडेवारीनुसार राज्यातील २ कोटी १५ लाख ४५ हजार २०१ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ४७ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी आधार कार्ड दिलेले नाही. ५ लाख ८२ हजार ७२६ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी अयशस्वी झाली. तर १२ हजार ४६४ विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे. १० लाख ४ हजार १५५ विद्यार्थ्यांचा अपार क्रमांक तयार करणे अयशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याबाबतच्या विषयाचा आढावा घेण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावरून शिबिरांचे आयोजन करून शाळांमधील विद्यार्थ्यांचा अपार आयडी काढण्याची प्रलंबित कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्यात यावी. याबाबत जिल्हा, तालुकास्तरावरून दररोज आढावा घेण्यात यावा. अपार आयडी तयार करण्यास शाळांना अडचणी येत असल्यास जिल्हा प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.