Ajit Pawar – मला तशी सगळीच गाणी ऐकायला आवडतात. खरं सांगायचं तर लता मंगेशकर, किशोर कुमार यांची गाणी मला जास्त आवडतात. प्रवासात किंवा निवांत वेळ मिळाला की युट्यूबवर ही गाणी मी नेहमी ऐकतो. त्यातही मेरे दिल में आज क्या है… हे माझं जास्त आवडतं गाणं आहे, असं सांगताना नेहमी करड्या नजरेने आणि थेट शब्दांत उत्तर देणाऱ्या अजित पवारांचा चेहरा त्या क्षणी अनपेक्षितपणे खुलून आला होता. नेहमी पत्रकारांच्या प्रश्नांवर तिरकस नजर, करड्या आवाजात अरे बाबा… मी सांगतोय ना, ते ऐक… तू आता गप्प बसतो का? असा दम भरणारे अजित पवार त्या दिवशी मात्र पत्रकारांशी अगदी निवांत, मनमोकळ्या गप्पा मारत होते. निमित्त होतं पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राजकीय क्षेत्र कव्हर करणाऱ्या पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पाचं.ही भेट ठरल्याचा निरोप आला तेव्हा दादा तासभर चर्चा करतील, असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या गप्पा तब्बल अडीच तास रंगल्या. या गप्पात राजकारणाबाहेरचे अजित पवार समोर उलगडत गेले. वडिलांच्या निधनापासून राजकारणातील प्रवेशापर्यंतचा प्रवास, आयुष्यात आलेले कडू-गोड अनुभव, आवडी-निवडी आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिनक्रम त्यांनी अगदी सहजपणे उलगडून सांगितला. काही प्रश्नांवर मिश्किल उत्तरं देत ते वातावरण हलकं करत होते, तर काही प्रश्नांवर नेहमीप्रमाणेच काही गोष्टी स्वतःकडेच ठेवत होते. संवादादरम्यान अनेकदा हसत हसत ते म्हणाले, बाबांनो, मी बोलतेय ते छापू नका. त्या क्षणी हा संवाद केवळ हलक्याफुलक्या गप्पांपुरताच मर्यादित राहील, असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या महिन्याभरातच या उमद्या, अभ्यासू आणि प्रभावी राजकीय नेतृत्वाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. असा सुरू व्हायचा दिवस दादा, तुम्ही सकाळी सहा वाजता काम सुरू करता, मग झोपता कधी? या पत्रकार मित्राच्या प्रश्नावर दादा हसले, बाबा, मी कामाचा माणूस आहे. मी रात्री १२ वाजेपर्यंत काम करतो आणि सकाळी पाच वाजता उठतो. उद्या काय करायचं आहे, हे माझं आधीच ठरलेलं असतं.सकाळी पाच वाजता उठल्यावर आधी प्राणायाम करतो. त्यानंतर घरातच मोठ्या आवाजात बातम्या ऐकतो. बातम्या पाहायलाच हव्यात असं नाही. अजित पवार तासाभरात दाढी, आंघोळ, नाश्ता करून सहा वाजता कामासाठी घराबाहेर पडतो. मग रात्री १२ वाजेपर्यंत थांबत नाही, असं सांगताना त्यांच्या आवाजात कामाविषयीची ठामपणा स्पष्ट जाणवत होता.मी आहे तो जनतेमुळे आहे. जनतेसाठीच काम करायचं, हीच साहेबांची शिकवण आहे आणि मी तसंच काम करतो, हे वाक्य बोलताना ते क्षणभर गंभीर झाले. काय काय आवडायचं…! अजित पवारांना निसर्गाची विशेष आवड होती. कुटुंबासोबत वेगवेगळ्या पर्यटनस्थळी फिरायला त्यांना मनापासून आवडत होतं. मात्र कामाच्या व्यापातून वेळ काढता येत नाही, याची खंतही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. गॉगल, घड्याळ आणि पेनची त्यांना खास आवड होती. ते म्हणाले, मला गाणी ऐकायला फार आवडतात. विशेषतः लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांची गाणी. मोबाईलमध्ये युट्यूबवर प्ले लिस्ट सेव्ह केली आहे. प्रवासात वेळ मिळाला की ही गाणी ऐकतोच. याशिवाय कुटुंबासोबत फिरणं, निसर्गाने नटलेली पर्यटनस्थळं, वेगवेगळे पदार्थ यांचीही त्यांना आवड होती. मला टापटीपपणा आणि स्वच्छता फार आवडते. घरात असलो तरी स्वतः त्याकडे लक्ष देतो, हे सांगतानाही त्यांचा स्पष्टपणा उठून दिसत होता. अजित पवार सोशल मीडियाकडे लक्ष देता का? राज्यात प्रत्येक मिनिटाला ब्रेकिंग सुरू असतं. सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असतं. अशा वेळी एवढ्या कामाच्या व्यापात मोबाईल बघायला वेळ मिळतो का?, या प्रश्नावर दादा थेट म्हणाले, नाही, मला अजिबात वेळ मिळत नाही. मी चार फोन वापरतो. त्यांनी पाऊच उघडून दाखवला. ते म्हणाले, एक फोन सर्वसामान्यांसाठी आहे. दुसरा व्हीआयपींसाठी. तिसरा प्रशासकीय कामांसाठी आणि चौथा कारखाने, सहकारी संस्था व पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी. त्यामुळे चार-चार फोन उचलावे लागतात. काही महत्त्वाचं असेल तर अधिकारी फोनवर कळवतात. तेवढ्यापुरताच सोशल मीडियाचा वापर होतो. बाकी सगळं माझी टीम पाहते. साहेबांच्या मुद्द्यावर भावनिक या भेटीदरम्यान शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्याबाबत विचारले असता अजित पवार क्षणभर भावूक झाले. पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात झालेली निवडणूक किती अवघड होती, याची जाणीव असल्याचं त्यांनी सांगितल. ते म्हणाले, प्रतिभा काकींनी आणि साहेबांनी मला सांभाळलं. मी मुंबईत कॉलेजला असताना त्यांच्याकडेच वाढलो. त्यामुळेच मी राजकारणात आलो. हे सांगताना त्यांचा आवाज कातर झाल्याचे जाणवत होते.साहेबांचा सहवास सर्व भावंडांमध्ये मला सर्वाधिक मिळाला. त्यामुळेच मी राजकारणात घडलो, असे सांगताना त्याच्या बोलण्यात कृतज्ञतेची भावना जाणवत होती. मात्र, पक्षफूट अपरिहार्य होती, हेही त्यांनी तेवढ्याच ठामपणे सांगितलं.