प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवित असून आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रितपणे पालिकेची निवडणूक लढविण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवार असल्याचा एबी फॉर्म देण्याचे काम सुरू होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाने युती केली आहे. मात्र, अनेक जागांवर दोन्ही पक्षाकडून उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शिवसेना (शिंदे गट) या पक्षानेही युतीची वाट न पाहता अनेक जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांना एकत्रितपणे निवडणूक लढवायची असेल तर काही जागांवरील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार (दि.2) पर्यंत दुपारी तीन पर्यंतच मुदत आहे. त्यामुळे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार का, याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. चर्चा करून अर्ज माघारी… प्रभागातील जागा वाटपाचा तिढा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुटेल. ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म दिले आहेत. त्याठिकाणी चर्चा करून उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही ज्यांच्या बरोबर युती करतो त्यांनी त्या जागा कुणाला द्यायच्या हा त्यांचा अधिकार असल्याचेही पवार यांनी सांगितले.