Ajit Pawar – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा मानाचा ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्कार यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्यासह पाच मान्यवरांना जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने हा बहुमान घोषित केला आहे. येत्या मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) सकाळी १०:३० वाजता विद्यापीठ परिसरातील इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलात हा सोहळा पार पडणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये दिवंगत अजित पवार यांच्यासह व्यापार व उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मश्री डॉ. अशोक खाडे, सहकार क्षेत्रासाठी अप्पासाहेब राजळे, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. पंडित विद्यासागर आणि कला क्षेत्रासाठी प्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना जीवनसाधना गौरव या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी या निवडीची अधिकृत माहिती दिली. शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत आयुष्यभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठ दरवर्षी या पुरस्काराने गौरवित असते. या सोहळ्यासाठी विद्यापीठाचे आजी-माजी पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.