Ajit Pawar – २५ जानेवारी २००५, सातारा जिल्ह्यातील वाई मधील मांढरदेवी काळूबाई मंदिरात शाकंभरी पौर्णिमेचा उत्सव, संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे तीन लाख लोक गडावर दर्शनाला आलेले आणि दुपारची वेळ. मांढरदेवी गडावर एकच हलकल्लोळ माजला. काय झाले हे कळायच्या आतच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. लोक धडपडत होते, खाली पडलेल्या लोकांना तुडवत अनेक जण धावत होते, पडत होते. यात लहान मुले, महिलांचा समावेश होता. पाहता पाहता सगळा गोंधळ नियंत्रणाबाहेर गेला आणि मृतदेहांचा खच पडला. याच वेळी प्रसंगावधान राखत अजितदादांनी जी उत्तम प्रशासकाची भूमिका बजावली, ती फक्त तेच करू शकतात आणि यासाठी असाच ठाम नेता असावा लागतो, याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला झाली. त्यामुळे याचा उल्लेख नक्कीच आजच्या दिवशी करावा लागेल.गडावर गेलेले भाविक नारळ फोडत होते. या नारळाचे पाणी पायऱ्यांवर ओघळत येऊन, पायऱ्या निसरड्या झाल्याने त्यावरून पाय घसरत होता. काही जण पडले आणि तेही एकमेकांवर पडल्यामुळे जोरात किंचाळण्याचा आवाज आला. खालच्या आणि वर गडावर गेलेल्या लोकांना काहीच समजले नाही. काहीतरी अघटित घडले आहे असे समजून पळापळ सुरू झाली. गडावर दुतर्फा असलेल्या दुकानांमध्ये गर्दी घुसली, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी तेथे गॅस सिलिंडर आणले होते, तेथे आग लागली, सिलिंडरचे स्फोट झाले. आणखी पळापळी वाढली आणि त्यामुळे जखमींची, मृतांची संख्या वाढली. मांढरदेवी २००५ अपघात त्या वेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी सुब्बराव पाटील होते, पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार होते आणि पोलीस उपअधीक्षक जय जाधव होते. हा सगळा प्रकार पोलिसांच्या, प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेला. अजितदादा तेथे पोहोचले आणि सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली. पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासन सगळ्यांनाच सूचना गेल्या. जखमी, मृतांना हलविण्यासाठी एसटी महामंडळाच्या सगळ्या गाड्या बोलावण्यात आल्या. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मैदानात तंबू टाकून तेथेच दादांनी तळ ठोकला. एसटी मागवल्या. तेथून मृतदेह वाईच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात हलविले. ठिकठिकाणाहून रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या आणि जखमींना वेगाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. वर जाण्याचा मार्ग बंद केला, गोंधळ कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली केल्या. जखमींवर उपचार होत होतेच; परंतु ३०० च्या वर भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या मृतदेहांची ओळख पटवून संबधित नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत ऍम्ब्युलन्सने पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली होती. केवळ प्रसंगावधान राखून हे अजितदादांनी केलेच; परंतु त्यानंतरही या गडावरचे प्रशासन सुधारले, काही चुकीच्या गोष्टींना आळा घालून तेथील यंत्रणा सुधारली. या घटनेनंतर आरोप – प्रत्यारोप झाले, राजकारणही खूप झाले. चौकशी समिती नेमली. असे असले तरी दादांची प्रशासनावरील पकड, त्यांचे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कौशल्य हे वाखाणण्याजोगेच होते. याचे अनेक साक्षीदार आजही त्याचा उल्लेख करतात. दादांच्या निधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या घटनेच्या आठवणींची वीण उसवली आहे.