Ajit Pawar – पुणे माझा जिल्हा आहे आणि तो राज्यातच नाही, तर देशात अग्रेसर असावा, हे केवळ स्वप्न नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ध्यास होता. पुण्यात उभ्या राहिलेल्या भव्य प्रशासकीय वास्तू केवळ सिमेंट- काँक्रीटचे सांगाडे नसून, त्या पुढच्या १०० वर्षांसाठी पुण्याचा अभिमान ठराव्यात, या जिद्दीने दादांनी पुण्याचे रूप पालटले. सत्तेत असताना विकासाचा डोंगर उभा करायचा आणि विरोधी पक्षात असतानाही त्या कामावर पितृतुल्य प्रेम करायचं, ही अजित पवारांची आगळीवेगळी कार्यशैलीची नागरिकांच्या कायमच स्मरणात राहणारी आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची अद्ययावत इमारत असो, की सारथीची वास्तू; शिक्षण आयुक्त कार्यालय असो किंवा नव्या विधानभवनाचे स्वप्न… या प्रत्येक प्रकल्पामागे अजित पवारांचा कटाक्ष होता. इमारत फक्त उभी करू नका, ती शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असावी, अशी त्यांची स्पष्ट भूमिका राहिली. महाविकास आघाडीपासून महायुतीपर्यंतच्या काळात त्यांनी केवळ निधीची तरतूद केली नाही, तर जागेची उपलब्धता आणि मंजुरीसाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केला.स्वतःच्या कार्यालयात कक्ष स्थापन करून दर महिन्याला आढावा बैठका घेतल्या. सोलर पॅनल, अग्निशमन यंत्रणा, जिन्यांमधील अंतर आणि पायऱ्यांची रचना यावर त्यांचा विशेष भर असायचा. इमारतीत पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिलीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. अन् हक्काची साथ पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी कधीच हात आखडता घेतला नाही. नागरिक जेव्हा या इमारतीत येतील, तेव्हा त्यांना समाधान वाटले पाहिजे, हा विचार मांडत त्यांनी निधीचा ओघ सतत सुरू ठेवला. त्यांच्या या सढळ हातामुळेच आज पुण्यातील प्रशासकीय कार्यालये कॉर्पोरेट दर्जाची वाटू लागली आहेत. अजित पवार कर्तव्यनिष्ठा ही एक घटना अजित पवारांच्या कामावर असलेल्या प्रेमाची साक्ष देते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन दादांच्या हस्ते झाले होते. मात्र, उद्घाटन भाजप-शिवसेना सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार विरोधी पक्षात होते, तरीही सायंकाळी ५ वाजता दादा अचानक इमारतीची पाहणी करायला पोहोचले. अवघ्या काही तासांत उद्घाटन या इमारतीची त्यांनी एक तास कसून पाहणी केली. दरवाजांच्या फटीतील रिकामी जागा असो किंवा बाथरूमच्या नळाचे फिटिंग, दादांची नजर तिथंही पोहोचली. सत्तेत नसतानाही आपल्या जिल्ह्यातली वास्तू परफेक्ट असावी, ही त्यांची भावना पाहून उपस्थित अधिकारीही गहिवरले. काम करायचं तर दर्जेदारच, हा संदेश त्यांनी त्या कृतीतून दिला. पुणेकरांच्या मनातलं दादापण आज जेव्हा नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, सारथीची इमारत, वस्तू व सेवा कर विभाग यांसारख्या इमारतींमध्ये जातात, तेव्हा त्यांना तिथली भव्यता आणि शिस्त जाणवते. हे यश केवळ निधीचे नसून, अजित पवारांच्या आपुलकीचे आणि दूरदृष्टीचे आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या मातीसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी एखादा नेता किती झोकून देऊन काम करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यातील या आधुनिक वास्तू आहेत.