प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेत कारभार्यांचे त्रिकुट आहे. ते बदलायला हवे. यासाठी महापालिकेत आम्हाला सत्ता द्या. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड बारामतीसारखे करून दाखवतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.वाहतूक कोंडीत जगामध्ये चौथा क्रमांक, खड्डयांचे रस्ते, कचर्याचे साम्राज्य, हवा आणि पाण्याचे प्रदूषणाचे शहर अशी पुण्याची ओळख मागील ९ वर्षे महापालिकेतील सत्ताधारी ‘त्रिकुटा’ने केली. ही ओळख बदलण्यासाठी ‘कारभारी’ बदला. माझ्या हाती सत्ता द्या, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर गुन्हेगार उमेदवारांवरून डिवचणारे भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत ‘जय जिनेंद्र’ म्हणत जैन बोर्डिंग जमीन विक्रीतील गैरव्यवहाराची आठवणही करून दिली.महापालिका निवडणुकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी, आरपीआय खरात गट, तसेच अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.पवार म्हणाले, की महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात केवळ तिघांचा कारभार चालायचा. हे ‘त्रिकुट’ शहरातील समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरले. मेट्रो प्रकल्प आमच्या काळात सुरू झाला; परंतु आजही सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकले आहे. रस्त्यांच्या कामासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींहून अधिकची तरतूद करण्यात आली. मात्र, यापैकी केवळ ६० टक्केच रक्कम खर्च झाली. रस्त्यांच्या कामात रिंग करणे, ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे एवढाच एककल्ली कार्यक्रम राहिला. त्यामुळे पुणेकरांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागला. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने मी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे २५० कि.मी.चे रस्ते दर्जेदार करून घेतले आहेत. आजही सुमारे एक हजार टन कचर्यावर प्रक्रिया होत नाही. शहरातील सीएनडी वेस्ट महामार्गांच्या कडेला टाकण्यात येतो. दररोज २०० टन ओला कचरा शेतात टाकण्यात येतो. १२ हजार कर्मचारी सफाईचे काम करतात. तरीही सर्वत्र कचर्याचे साम्राज्य दिसून येते. आजही मैलापाण्यावर पूर्णतः प्रक्रिया होत नाही. एसटीपींचे प्रकल्प रखडल्याने नदीचे पाणी दूषित आहे. हवेचे प्रदूषण वाढले आहे. याला कारणीभूत सत्ताधार्यांची शहराबद्दलची अनास्था असल्याची टीका पवार यांनी केली.महापालिकेत ३२ गावांचा समावेश केला. मात्र, या गावांतील कामांसाठी तरतूद केलेल्या रकमेतील जेमतेम २० टक्के निधी वापरला आहे. येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यांच्यावर जिझिया कर लावला आहे. अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांची तरतूदत करूनही रस्त्यांसाठी भूसंपादन होत नाही, असे पवार म्हणाले. घायवळ परदेशात कसा पळाला गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मोहोळ यांनी कोथरूडमधील घायवळ हा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला, याबाबत सांगावे. याशिवाय जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डिंग जागेच्या गैरव्यवहारावरून मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला. एखाद्याच्या पतीने गुन्हा केला म्हणून त्याची पत्नी व कुटुंबीयांना गुन्हेगार ठरविणे योग्य नाही.