प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंंग्रेस (अजित पवार) बरोबर युती करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान अंतिम असेल तर त्यांनी ते विचारपूर्वक केलेले असेल. त्यानुसारच राष्ट्रवादी काॅंंग्रेसकडून महापालिका निवडणूक लढविली जाइल. असे सांगत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे तसेच निवडणुकीविषयी योग्य वेळी व योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काॅंंग्रेस पक्ष अजित पवार आणि भारतीय जनता पक्षा आमने-सामने लढतील. एवढेच नव्हे तर पुण्यात शिंदे गटाशी शिवसेनेसोबत भाजपची युती राहील, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काॅंंग्रेस पक्ष अजित पवार काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. यासदंर्भात अजित पवार यांनी सोमवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट भूमिका न मांडता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्त्यव्यावरुन त्यांच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काॅंंग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत दिले. फडणवीस यांनी केलेले विधान अंतिम असेल, त्यामुळे त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप बरोबर मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाऊ आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असेही पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काॅंंग्रेस (अजित पवार) स्वबळावरच महापालिका निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.