प्रभात वृत्तसेवा पुणे – इंडिगो कंपनीचे विमान अचानक रद्द होणे, उशीराने उड्डाण होणे अशा विस्कळीत सेवेमुळे मागील दहा दिवसांपासून पुणे विमानतळावर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आता विस्कळीत विमानसेवा पुर्वपदावर येत असून, बुधवारी पुण्यातून संध्याकाळी सातपर्यंत एकूण १४२ विमानांचे उड्डाण झाले. एकूण २३ हजार २०४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. इंडिगोची पुण्यात येणारी व जाणारी एकूण १३ विमाने रद्द झाली.केबिन स्क्रू व वैमानिकांच्या कामाच्या नियमात बदल केल्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पुण्यासह देशभरातील लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. आपत्कालीन परिस्थिती असताना वेळेवर पोहोचता न आल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. अनेकांचे लगेज अद्यापही मिळालेली नाहीत. तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी अनेक प्रवाशांच्या तक्रारी सुरूच आहेत. पुणे विमानतळावरील परिस्थिती सध्या पूर्वपदावर येत असून, पुण्यातून बुधवारी नियोजनानुसार सर्व उड्डाणे वेळेत पार पडली. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट, अकासा एअर, फ्लाय ९१ तसेच इंडिगो अशा सर्व विमान कंपन्यांची उड्डाणे नियोजित वेळापत्रकानुसार झाली. टर्मिनल सेवा किंवा ग्राउंड हँडलिंगमध्ये कोणताही खंड पडला नाही. प्रवासी सेवांचा दर्जाही कायम राखण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. इंडिगोने १० डिसेंबरला ५३ आगमन आणि ५३ प्रस्थान उड्डाणांचे वेळापत्रक तयार केले होते. त्यापैकी ६ आगमन आणि ७ प्रस्थान उड्डाणे पूर्वनियोजितपणे रद्द करण्यात आली आहेत. याची माहिती प्रवाशांना आधीच देण्यात आली होती.