प्रभात वृत्तसेवा पुणे : राज्यात बिल्डर आणि ठेकेदारांचे सरकार काम करत असून सगळीकडे भाजपचे नेते भूखंड गिळण्याचे काम करत आहेत. असाच प्रकार पुण्यात सुरू असून भविष्यात नवी पेठेतील लोकमान्य नगरमधील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पावर बुलडोझर चालविण्याचा प्रयत्न झाल्यास बुलडोझरसमोर सर्वप्रथम आपण स्वतः उभे राहू अशा शब्दात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या वसाहतीमधील नागरिकांना दिलासा दिला. याप्रकरणी दिलेल्या स्थगितीवरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाना यांनी साधला. आपला पक्ष शेवटपर्यंत रहिवाशांसोबत राहिल, असे आश्वासन दिले. यावेळी लोकमान्य नगर कृती समितीचे ॲड. गणेश सातपूते शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हारणावळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. लोकांच्या घरांवर, त्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. सरकारने तातडीने याप्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी टाकरे यांनी केली. हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लोकमान्य नगरच्या नागरिकांसोबत ठामपणे उभे राहू असेही ते म्हमाले. पुण्यात ‘छोटा अदानी’ कोण ? मुंबईत ज्या पद्धतीने मोठे प्रकल्प अदानीच्या घशात घालण्यात आले, त्याच धर्तीवर पुण्यात छोटा अदानी कोणाला बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, हा प्रश्न आहे. लोकमान्य नगरचा साडेसोळा एकरचा मौल्यवान भूखंड कुणाच्या घशात घालण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. लोकांच्या हक्कांवर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न रस्त्यावर उतरून, जनतेच्या ताकदीने उधळून लावू, असेही ठाकरे म्हणाले.