पुणे : लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या प्रकरणातील पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ यांच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीला पुढील तपासासाठी लष्कर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. जाहिद कमरुदीन शेख (२०, रा. लोहियानगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपाच्या कार्यालयामध्ये जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादीसह इतरांना आत कोंडून ठेवण्यात आले. यानंतर त्यांना धमकावून जबरी चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२ यांच्या मार्फत सुरू होता. दरम्यान सोमवारी गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार अजीम शेख आणि सददाम तांबोळी यांना आरोपी लोहियानगर असल्याचे समजले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने धाड टाकून आरोपीला जेरबंद केले. ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार संजय जाधव, विनोद चव्हाण, शंकर नेवसे, नागनाथ राख, संदिप शिर्के, विशाल दळवी, विजयकुमार पवार, संजय टकले, शंकर कुंभार, संजय आबनावे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, योगेश मांढरे, सर्जेराव सरगर, सददाम तांबोळी आणि अजीम शेख यांच्या पथकाने केली.